औरंगाबाद – भाजप-शिवसेना युती
सरकार शेतकऱ्यांसाठी यमासमान असल्याचा हल्लाबोल मनसेच्या दंडुका मोर्चातून करण्यात
आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या फडणवीस सरकारच्या शेतकरी
विरोधी धोरणांमुळे होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मंगळवारी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरली. शहरातील पैठणगेट येथून मंगळवारी मनसेने ‘दंडुका मोर्चा’ काढला. विभागीय आयुक्तालयावर
गेलेल्या या मोर्चात अग्रभागी एक रेडा चालत होता. त्याच्या पाठीवर ‘शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरुपी
सरकारचा जाहिर निषेध’ असे बॅनर होते.
दंडुक्याची परवानगी पोलिसांनी
नाकरली
दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या विविध
मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी पैठणगेट येथून विभागीय आयुक्त
कार्यालयावर ‘दंडुका मोर्चा’ काढण्यात आला. मोर्चात दंडुका
हातात घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असल्यामुळे ऊसाचे टिपरू हातात घेऊन
कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
रेडा ठरला लक्षवेधी
मनसेचे आंदोलन हे सर्वांपेक्षा
हटके असते, याची प्रचिती मंगळवारी निघालेल्या मोर्चातही आली मोर्चाच्या अग्रभागी
मोठी शिंगे असलेला एक रेडा चालत होता. त्याच्या पाठीवर असलेल्या बॅनरवर ‘शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरुपी
सरकारचा जाहिर निषेध’ असे लिहिले
होते. हे सरकार शेतकऱ्यांसाठी यम ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारविरोधात
जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बैलगाड्या घेऊन आले शेतकरी
संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ
जाहीर करण्याच्या मागणीसोबतच कोरडवाहू शेतकऱ्यांना ५० हजार आणि बागायतदार
शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देण्याची मागणी मनसेने केली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना
पेन्शन मिळाली पाहिजे यासह १७ मागण्यांसाठी मनसेने मोर्चा काढला. या मोर्चात
शेतकरी बैलगाड्या घेऊन आले.










